१०० दिवस कृती आराखड्याअंतर्गत कळवण प्रशासकीय इमारतीत स्वच्छतेची लगबग
कळवण –
गेल्या काही महिन्यांपासून अस्वच्छता आणि सुविधा अभावाच्या बातम्यांमुळे चर्चेत असलेली कळवण प्रशासकीय इमारत अखेर झळाळून निघत आहे. महाराष्ट्र शासनाच्या ७ कलमी कृती आराखड्यांतर्गत राबवण्यात येणाऱ्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून इमारतीत स्वच्छता, सुशोभीकरण आणि सुविधा उभारणीची कामे जोरात सुरू आहेत.
याअंतर्गत इमारतीच्या आतील व बाहेरील भागाची साफसफाई करण्यात आली असून, स्वच्छतागृहांची दुरुस्ती व पाणीपुरवठा सुधारण्यावर भर देण्यात आला आहे. पिण्यासाठी आर. ओ. पाणी शुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले असून, नागरिकांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित पाणी उपलब्ध झाले आहे.
सुशोभीकरणाचा भाग म्हणून इमारतीच्या प्रवेशद्वारासह पायऱ्यांवर नवीन सजावटीच्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. परिसरातील झाडांना छाटणी व देखभाल देऊन हिरवाईत भर टाकण्यात आली आहे. तसेच इमारतीला नवे रंगरंगोटी देऊन परिसर आकर्षक करण्यात आला आहे.
प्रांताधिकारी कार्यालयासह तहसील, पंचायत समिती, पोलीस, कृषी आणि इतर शासकीय कार्यालये एकाच इमारतीत असल्याने येथे नागरिकांची मोठी वर्दळ असते. नव्या बदलांमुळे नागरिकांना स्वच्छ, आल्हाददायक आणि सुव्यवस्थित वातावरण मिळू लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.